Jayant Patil Court Warrant: जयंत पाटील यांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट; काय आहे प्रकरण? घ्या जाणून
Jayant Patil | (Pic Credit - ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नावे इसलांपूर न्यायालयाचे (Islampur Court) वॉरंट निघाल आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या एकूण राजकीय जीवनात पाटील यांना प्रथमच न्यायालयात स्वत:हून हजर व्हावे लागणार आहे. पाच वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात न्यायालयाने हे वॉरंट काढले आहे. एका आंदोलनात जयंत पाटील यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात वारंवार समन्स बजावूनही पाटील हे न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आता त्यांना थेट वॉरंटच काढले आहे.

जयंत पाटील यांच्या एकूण राजकीय जीवनात त्यांच्यावर प्रथमच गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे. (हेही वाचा, Jayant Patil Statement: शिंदे आणि फडणवीस यांचे हे सरकार 2024 पर्यंत चालणार नाही, जयंत पाटीलांचे वक्तव्य)

काय आहे प्रकरण?

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काही कारणांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या वेळी जयंत पाटील यांनीही कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत शिगाव येथील रस्त्यावर ठिय्या मांडला होता. या वेळी परिसरात जमावबंदी लागू होती. अशा वेळी जयंत पाटील यांनी जमावासोबत आंदोलन केले. जमाव जमवला. त्यामुळे मुंबई पोलिस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. जयंत पाटील यांच्यासोबतच स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील , शरद गायकवाड , मोहन गायकवाड , राजेंद्र भासर , विलासराव शिंदे , जितेंद्र पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.

जयंत पाटील यांच्यावर इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जयंत पाटील यांना वारंवार समन्स देण्यात आले. यापैकी कोणत्याच समन्सला जयंत पाटील हजर राहिले नाहीत. अखेर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले आहे. दरम्यान, जयंत पाटील हे स्वत: न्यायालयात हजर राहिले त्यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे.