राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेना पक्षातून वेगळे होऊन महाराष्ट्र नवनिर्मण सेना या स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. मनसेने लढलेल्या 2009 सालच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळालेही आणि याच यशासोबत त्यांच्या पक्षाला 'रेल्वे इंजिन' (MNS Railway Engine) हे निवडणूक चिन्ह मिळालं. परंतु, त्यानंतर लढलेल्या निवडणुकांना मात्र मनसेला हवं तसं यश मिळू शकलेलं नाही. आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी आज राज्यव्यापी महाअधिवेशन (MNS Maha Adhiveshan) बोलवून पक्षात काही बदल करायचे ठरवले आहे.
राज ठाकरे यांनी नुकतेच मनसेच्या नव्या झेंड्याचे (MNS New Flag) अनावरण केले आहे. मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवराजमुद्रा पाहायला मिळते. तसेच आज सायंकाळपर्यंत चालणाऱ्या या महाअधिवेशनात, राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मनसे यापुढचं राजकारण करतील असं दिसून येतंय.
असाच काहीसा इतिहास आहे शिवसेनेचासुद्धा. आधी शिवसेनेचे देखील रेल्वे इंजिन हेच निवडणूक चिन्ह होतं. मनोहर जोशी यांच्या एका जुन्या फोटोमध्ये ते दिसून येते. परंतु, 1988 साली जेव्हा राजकीय पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह द्यायचे ठरले, तेव्हाच बाळासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलून धनुष्य बाण हे शिवसेनेचा अधिकृत निवडणूक चिन्ह घ्यायचे ठरवले. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांनी देखील शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठीचा मुद्दाच हाती घेतला होता. परंतु, त्यांनी देखील त्यांची विचारसरणी बदलत पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यालाच प्राधान्य दिले.
मनसे चं महाअधिवेशन तर शिवसेनेचा वचनपूर्ती जल्लोष; दोन्ही पक्षांकडून आज शक्तिप्रदर्शन?
त्यामुळे राज ठाकरे हे देखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत राजकारणातील वाटचाल करत आहेत का असा प्रश्न उद्भवतो. आणि याचा शिवसेनेप्रमाणेच मनसेला देखील फायदा होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.