IPS Mokshada Patil Fake Twitter Account:  पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावे फेक अकाऊंट; सायबर भामट्याचा आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Cyber Crime: सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालत असलेल्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक नागरिकांना सायबर गुन्हेगारांचा फटका बसला आहे. पण आता चक्क आयपीएस अधिकारीही सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात आल्याचे एका घटनेतून पुढे आले आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते बनवून सायबर चोरट्याने अनेक बड्या अधिकाऱ्यांना गंडा घातला आहे. सायबर भामट्याने भावनिक कारण पुढे करत अनेक अधिकाऱ्यांना चुना लावल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्रकार?

मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) या छत्रपती संभाजी नगर लोहमार्ग पोलीस अधिक्षक आहेत. त्यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर एक बनावट खाते तयार केले. या खात्याच्या माध्यमातून अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना संपर्क केला. तसेच, मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले आहे. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. त्यासाठी आर्थिक मगत करण्याचे भावनिक अवाहन या भामट्याने अधिकाऱ्यांना केले. शिवाय उपचार सुरु असलेल्या एका मुलीचा आणि महिलेचा फोटो सोबत क्यूआर कोडही ट्विट करुन तो व्हायरल करण्यात आला. अनेक अधिकारी आणि नागरिकांनी खात्याची खातरजमा न करता हा खाते मोक्षदा पाटील यांचेच असावे असा समज करुन घेतला. त्यांनी या भामट्याला आर्थिक मदतही केल्याचा प्रकार पुढे आला आहे. (हेही वाचा, Cyber Fraud in Thane: केवायसी अपडेटच्या नावाखाली, वृद्धाला 7.38 लाख रुपयांचा गंडा; ठाणे येथील घटना)

दरम्यान, सोशल मीडियावर आपल्या नावे खाते बनवून पैसे मागितले जात असल्याची माहिती स्वत: मोक्षदा पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधला आणि हे खाते बंद करण्यास सांगितले. सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्विटरला रिपोर्ट केला त्यानंतर 27 मार्चला रात्री 11 वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले.

पोलिसांनी प्रकरणाची दखल घेऊन सायबर गुन्हेगाराचा शोथ सुरु केला आहे. तसेच, आपल्याशी परिचीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच सोशल मीडियाद्वारे संपर्कात आलेल्या परिचिती व्यक्तीलाही प्रत्यक्ष भेटून खातरजमा केल्याशिवाय अथवा तसा विश्वास मिळाल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार टाळावेत, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.