BMC Commissioner Iqbal Singh Chahal (Photo Credit: Twitter)

देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) कहर पाहायला मिळाला. यातच रुग्णालयात बेड, रेमडेसिवीर, ऑक्सिजन यांची मोठी कमतरता भासत होती. मात्र ही परिस्थिती देखील मुंबई पालिकेने व्यवस्थित हाताळली. यावरुन मुंबई पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) व्यवस्थापनाचं नीती आयोगाने (Niti Aayog) कौतुक केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईत कोविड-19 च्या उद्रेकादरम्यान पालिकेकडून तातडीने उपाययोजना केल्या गेल्या. बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित केली गेली. त्याचबरोबर मुंबईची ऑक्सिजन वितरण प्रणाली देखील कौतुकास्पद होती. या सर्व कारभारावरुन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही महापालिका आयुक्तांच कौतुक केलं आहे. (Mumbai Drive in Vaccination: मुंबईत 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’; तुमच्या नजिकचे लसीकरण केंद्र इथे पाहा)

अमिताभ कांत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप करणं, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणं. हे कोविड व्यवस्थापनेचं प्रेरणादायी मॉडेल आहे." त्याचबरोबर त्यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

अमिताभ कांत ट्विट:

यापूर्वी सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुंबई पालिकेच्या कोरोना लढ्यातील कामगिरीचे कौतुक केले होते. तसंच मुंबईने तयार केलेलं मॉडेल देश आणि राज्य स्तरावर लागू करणे शक्य आहे? असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केला होता. या सर्वांकडून मुंबई पालिका प्रशासनाचं कौतुक होत असलं तरी विरोधीपक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे आभासी चित्र निर्माण केले जात असल्याचं म्हटलं आहे.