IIT Mumbai (File Image)

इंडियन इन्स्ट्यीट्युट ऑफ मुंबई अर्थातच आयआयटी मुंबई (IIT Bombay) च्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी 'केवळ शाकाहारी' धोरणाला तीव्र विरोध दर्शवला होता. विद्यार्थ्यांनी या धोरणाविरोधात अत्यंत शांतपणे आपले विरोध दर्शवला होता. मात्र, तरीही त्याची मोठी आर्थिक किंमत विद्यार्थ्यांना सहन करावी लागत आहे. इंडियाटुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मेस कौन्सिलने बसवलेल्या 'Vegetarian Only' टेबलाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटापैकी एका विद्यार्थ्याला तब्बल 10,000 रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, संस्थेच्या 12, 13 आणि 14 वसतिगृहातील मेस कौन्सिलने गेल्या आठवड्यात कॉमन मेसच्या जागेत शाकाहारींसाठी सहा टेबल्स राखून ठेवले होत्या. विद्यार्थ्यांच्या एका गटाने मेसच्या विभक्तीकरणाविरोधात मूक निषेध केला. तसेच 'केवळ-शाकाहारी' टेबलांपैकी एका टेबलवर मांसाहार केल्याने वाद सुरू झाला.

सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापणाने चैकशीसाठी एक समिती स्थापन केली. या समितीने केलेल्या चौकशीनंतर सांगण्यात आले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीला काही विद्यार्थी बळजबरीने संस्थेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. संस्थेने एका विद्यार्थ्याला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर दोन विद्यार्थ्यांची ओळख पटलेली नाही. वसतिगृह व्यवस्थापकाने विद्यार्थ्याला ईमेलद्वारे सोमवारी कळवले की संस्थेने 10,000 रुपये दंड ठोठावला आहे आणि ही रक्कम त्याच्या स्पेशल मेन्शन अकाउंट्स (SMA) खात्यातून कापली जाईल.

विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर तक्रारींवर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापणाने मेस कौन्सिलची बैठक घेतली. बैठकीच्या इतिवृत्तांत असे म्हटले आहे की, "असोसिएट डीन एसए (विद्यार्थी व्यवहार) यांनी दिलेल्या सल्ल्याचा अवमान करून गोंधळात शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा हा पूर्वनियोजित प्रयत्न होता. मेस कौन्सिलने वसतिगृह 12, 13 आणि 14 कौन्सिलमधील विद्यार्थी प्रतिनिधींना या घटनेत सहभागी असलेल्या इतर दोन व्यक्तींची ओळख पटवण्यास मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ओळख पटल्यानंतर, त्यांच्याविरुद्ध देखील योग्य शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.