Ranveer Allahbadia फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

यूट्यूबवरील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India's Got Latent) हा विनोदी कार्यक्रम फेब्रुवारी 2025 मध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडला. अनेकांनी तक्रार केली होती की, या शोमधील विनोद, टिप्पण्या या अश्लील आणि आक्षेपार्ह आहेत. या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला आई-वडिलांच्या शारीरिक संबंधाबाबत एक प्रश्न विशाराला होता, त्यानंतर या शोबाबतचा राग आणखीन वाढला. या शोचा होस्ट समय रैना याच्यासह यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया- बीयरबायसेप्स (Ranveer Allahbadia), अपूर्वा मुखर्जी (Apoorva Mukhija), आशीष चंचलानी आणि शोच्या आयोजकांवर गंभीर आरोप झाले. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली, आणि आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाईचा विचार सुरू केला आहे.

रणवीर आणि अपूर्वा यांनी पोलिसांच्या समन्सला प्रतिसाद न दिल्याने त्यांच्याविरुद्ध पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे की, इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात युट्यूबर्स अपूर्वा मुखीजा आणि रणवीर अलाहाबादिया सहकार्य करत नाहीत. महाराष्ट्र सायबर सेलचे म्हणणे आहे की, ते समन्सला उत्तर देत नाहीत. महाराष्ट्र सायबर सेलने समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्वा आणि रणवीर अलाहाबादिया यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठवले होते. या समन्सनंतर, फक्त समय रैना आणि आशिष चंचलानी हे सायबर सेलसमोर हजर झाले.

रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा यांनी महाराष्ट्र सायबर सेलने जारी केलेल्या समन्सला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करू शकतात. महाराष्ट्र सायबरने स्पष्ट केले आहे की, ते डिजिटल स्पेसची सुरक्षा आणि नैतिक मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहेत. अश्लील आणि प्रक्षोभक सामग्रीसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

यापूर्वी अपूर्वा मुखीजा आणि रणवीर अलाहाबादिया यांनी दावा केला होता की, त्यांना सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर धमकीचे संदेश येत आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, या वादाची सुरुवात एका भागातून झाली, जिथे रणवीरने एका स्पर्धकाला पालकांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अश्लील प्रश्न विचारला. या टिप्पणीने सोशल मीडियावर प्रचंड संताप निर्माण झाला. यानंतर रणवीर, अपूर्वा, समय आणि आशीष यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या. (हेही वाचा: Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरण, मुंबई पोलिसांकडून 1000 पानांचे आरोपपत्र दाखल)

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला. फेब्रुवारीत रणवीरला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला, पण न्यायालयाने त्याच्या टिप्पणीला ‘अश्लील’ आणि ‘असंस्कृत’ ठरवले. नुकतेच, रणवीर आणि आशीष यांनी आपले पासपोर्ट परत मिळवण्यासाठी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली, कारण चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. रणवीरने आपल्या पॉडकास्टमधून या प्रकरणावर बोलताना सांगितले की, या घटनेने त्याच्यावर मानसिक परिणाम झाला, पण यातून त्याला खऱ्या मित्रांची आणि शत्रूंची ओळख झाली. त्याने स्वतःच्या चुका मान्य केल्या आणि भविष्यात अधिक जबाबदारीने वागण्याचे आश्वासन दिले.