ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पतीला खांद्यावर घेणार्‍या रेणूका गुरव यांची डाक विभागाकडून दखल; सन्मानार्थ जारी केले खास पोस्ट तिकीट
Renuka Gurav| Photo Credits: Twitter/ Anil Deshmukh

निवडणूकीमध्ये विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी काढलेल्या भव्य रॅलीज अनेकदा राजकारण्यांनी पाहिल्या असतील. पण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकाल्याच्या धुरळ्यामध्ये एका विजेत्या उमेदवाराच्या पत्नीने त्याला खांद्यावर घेत काढलेल्या मिरवणूकीचा फोटो आणि त्या आनंदोत्सवाची चर्चा फार झाली होती. सोशल मीडीयातही तो फोटो विशेष गाजला. पुरूषप्रधान संस्कृतीच्या बेड्या तोडत महिलांना आत्मविश्वास देणारी ही महिला होती रेणूका गुरव (Renuka Gurav). आता रेणूका यांची केंद्र सरकारच्या डाक विभागाने (India Post Office) दखल घेतली आहे. 'कारभारी लय भारी' म्हणत पतीला खांद्यावर घेणार्‍या रेणूका गुरव यांच्या सन्मानार्थ डाक विभागाने एक विशेष पोस्टाचं तिकीट (Postal Stamp) जारी केलं आहे.

रेणूका गुरव यांचा फोटो पोस्टाच्या तिकीटावर पाहून सध्या गुरव कुटुंबामध्ये आनंद द्विगुणित झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष गुरव यांनी विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव करत विजय नोंदवला आहे. त्यांच्या विजयांचा महिलांचा मोठा वाटा होता. त्यामुळे विजयी मिरवणूकीमध्ये रेणूका यांनी पतीला थेट खांद्यावर घेत आपला विजयोत्सव साजरा केला.

रेणूका यांना पुणे ग्रामीण विभाग कार्यालय येथील डाक घरातून खास त्यांचा फोटो असलेला स्टॅम्प दिला आहे. दरम्यान हा सन्मान रेणूका यांनी गावाला समर्पित केला आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल इतकंच आपलं अस्तित्त्व न ठेवता पुरूषाच्या खांद्याला खांदा लावत बाहेर पडण्याची, काम करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Post Office National Savings Certificate Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस योजनेत केवळ 5 वर्षात मिळणार 21 लाख रुपये; 100 रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील रेणूका गुरव यांचा फोटो करत तिच्या कृतीचं अभिनंदन केलं होतं.