Western AC Local Train (Photo Credits: Twitter)

रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि आरामदायी सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेवर (Western Railway) डिसेंबर 2017 मध्ये वातानुकूलित लोकल सेवा(AC Local Train) सुरु केली. मात्र आता ह्या वाताुकूलित लोकल रेल्वेच्या तिकिट दरात वाढ होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून म्हणजेच 1 जून पासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे. वातानुकूलित लोकल रेल्वेच्या आधीच्या तिकिट दरात 1.3 पटीने वाढ करण्यात आली आहे.

आता नवीन दरवाढीनुसार, वातानुकूलित लोकलचे किमान भाडे 65 रुपये आणि कमाल भाडे 220 रुपये असेल. प्रवाशांमध्ये वातानुकूलित लोकलची लोकप्रियता वाढवण्यासाठी 25 डिसेंबर 2017 ते 31 मे 2019 या काळात सामान्य लोकलच्या प्रथम दर्जाच्या तिकिट दरांच्या केवळ 1.2 पटीने वातानुकूलित लोकलचे तिकिट दर आकारण्यात आले. मात्र आता ह्या दरात आता 1 जूनपासून 1.3 पटीने वाढ करण्यात आली आहे. पाहूयात काय असतील नवीन तिकिट दर:

चर्चगेट ते प्रभादेवी : ६५

चर्चगेट ते दादर : ९०

चर्चगेट ते अंधेरी : १३५

चर्चगेट ते बोरिवली : १८०

चर्चगेट ते भाईंदर : १९०

चर्चगेट ते विरार : २२०

पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 नियमित लोकल गाड्या होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

असे असले तरीही, वातानुकूलित लोकल रेल्वेच्या पासधारकांना मात्र ह्या नवीन दरवाढीचा झळ लगेच सहन करावी लागणार नाही. दरवाढी आधीच मासिक आणि त्रैमासिक पास काढलेल्या प्रवाशांकडून नवीन तिकिट दरांची रक्कम वसूल करण्यात येणार नाही. प्रथम दर्जातील तिकिट वातानुकूलित लोकल तिकिटांसाठी अद्ययावत करताना सुधारित फरक मात्र प्रवाशांना द्यावा लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.