प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबई:  पश्चिम रेल्वे (Western Railway) वरील चर्चगेट (Churchgate) ते बोरिवली/विरार (Borivali/Virar) स्थानकांच्या दरम्यान धावणाऱ्या बारा नियमित लोकल ट्रेन येत्या काळात कायमच्या बंद करण्यात येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यामागे बहुप्रतीक्षित दुसऱ्या एसी लोकल (AC Local) चे आगमन हे कारण समोर येत आहे.  जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दुसरी एसी लोकल सुरु करण्याची तयारी पश्चिम रेल्वेकडून होत आहे. मात्र या एसी लोकलच्या सुविधांसाठी मुंबईकर प्रवाश्यांना बारा लोकल गाड्यांच्या सेवेवर पाणी सोडावे लागू शकते.

2015 मध्ये सुरु झालेल्या पहिल्या एसी लोकलसाठी अगोदरच बारा गाड्या बंद करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे आता दुसऱ्या एसी लोकलसाठी देखील नियमित लोकल बंद कराव्या लागू शकतात.  मुंबई मिररच्या वृत्तानुसार  ,प्रवाश्यांची मागणी पाहून येत्या काळात एसी लोकलची संख्या किंवा फेऱ्या वाढवण्याचा विचार आहे. यासाठी सध्या सकाळच्या वेळेत असलेल्या एका लोकल ऐवजी तीन लोकल तर संध्याकाळी असलेल्या दोन ऐवजी तीन एसी लोकल चालवण्याचा प्रयत्न आहे,असे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे.

अशा असतील एसी लोकलच्या संभाव्य फेऱ्या

-सकाळी चर्चगेटला जाण्यासाठी विरार वरून दोन एसी लोकल

- बोरिवली वरून चर्चगेटला जाणाऱ्या 7.54  च्या लोकल सोबतच आणखीन एक एसी लोकल

- संध्याकाळी 5.49 ला सुटणारी चर्चगेट-बोरविली लोकल व 7.49  ला चर्चगेट- विरार लोकल दरम्यान एक एसी लोकल

यामुळे रद्द होऊ शकणाऱ्या गाड्यांमध्ये सकाळच्या वेळेत चर्चगेटला जाणाऱ्या दोन तर संध्याकाळी विरारला जाणारी एक लोकलसेवा समाविष्ट असेल.

एकीकडे एसी लोकलची वैशिष्टय अद्ययावत असली तरी नियमित लोकलच्या तुलनेत बरेच जास्त असणारे तिकिटाचे दर पाहून आजही अनेक जण लोकल ट्रेनलाच अधिक पसंती दर्शवतात. यामुळे रोज लोकल गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा कित्येक पट जास्त गर्दी पाहायला मिळते अशात गाड्यांची संख्या कमी केल्यास उर्वरित प्रवाश्यांना गैरसोय होऊ शकते अशी तक्रार केली जात आहे.

दरम्यान गुरुवारी दुसरी एसी लोकल मुंबईमध्ये दाखल झाल्यावर व त्यानंतर 20 दिवस चाचणी घेण्यात येईल तसेच सध्या उपलब्ध असणारी एसी लोकल ही दुरुस्ती व तपासणी साठी साधारण 45 दिवस जातील. एकदा या दोन्ही गाड्या उपलब्ध झाल्यावर एसी लोकलचे सुधारित वेळापतर्क लागू करण्यात येईल असे, पश्चिम रेल्वेचे अधिकारी रविंदर भाकर यांनी सांगितले आहे.