महाराष्ट्र पोलिस दलात एकूण 2,416 पोलिस कोरोना बाधित; मागील 24 तासांत 91 पोलिसांना कोविड-19 ची बाधा
Maharashtra Police | (File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) या कठीण काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेले पोलिस देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. दिवसागणित कोरोना बाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांत 91 पोलिसांना कोविड-19 (Covid-19) ची बाधा झाली आहे. या नव्या भरीसह महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलातील एकूण 2,416 पोलिस कोरोना बाधित आहेत. त्यापैकी 1421 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर 26 पोलिसांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन काळात पोलिसांवर ताण अधिकच वाढला आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांती देण्यासाठी SRPF च्या जवानांना मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर यांसारख्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी तैनात करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस खात्यातील अधिकारी किंवा कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना चांगले उपचार, सुविधा मिळतील याकडे पोलिस खात्याचं लक्ष आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. (महाराष्ट्रात तैनात SRPF च्या 545 जवानांना कोरोना व्हायरसची लागण; योग्य उपचारानंतर 388 जण सुखरुप घरी परतले- गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)

ANI Tweet:

देशभरातील कन्टेमेंट झोनमध्ये लॉकडाऊनचा कालावधी 30 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर अनलॉक 1 च्या माध्यमातून तीन टप्प्यात वेगवेगळ्या सेवा-सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांवरील भार अधिकच वाढणार आहे, यात शंका नाही. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या देखील वाढत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 65168 वर पोहचली आहे. तर एकूण 2197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.