हुंड्यासाठी दबाव टाकत विवाहितेच्या तोंडात थायरॉइडच्या गोळ्या कोंबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव (Jalgaon District) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner Taluka) तालुक्यात ही घटना घडली. पीडिता रंजिता दीपक सपकाळे (वय-32 , प्रताप मिल कंपाउंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्राप्त फिर्यादीवरुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती, सासूसह इतर पाच जणांचा समावेश आहे.
रंजिता दीपक सपकाळे यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, पती दीपक रमेश सपकाळे याच्यासोबत 2005 मध्ये विवाह झाला. विवाहात योग्य तो मानपान झाला नाही, अशी पतीकडील (सपकाळे कुटुंबीय) मंडळींचे म्हणणे आहे. आज घडीला विवाहाला 13 वर्षे उलटून गेली. मात्र, तरीही विवाहातील मानपानावरुन पती दीपक रमेश सपकाळे, सासू इंदूबाई रमेश सपकाळे, दीर प्रवीण रमेश सपकाळे, दिराणी पूनम प्रवीण सपकाळे, नणंद नलिनी संजय अहिरे, सविता सैंदाने, कविता संदीप कांबळे हे लोक आपला शारीरिक आणि मानसिक छळ करतात.
सततच्या छळाला कंटाळून पीडितेने 50 हजार रुपये माहेरुन आणून दिलेही. परंतू, हे पैसे दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सासरकडील मंडळींच्या वागणूकीत सुधारणा झाली. परंतू, कालांतराने पुन्हा पैशासाठी तगादा, शारीरिक आणि मानसिक त्रास सुरु झाला. पीडितेची नणंद कविता कांबळे हिचे अधून-मधून माहेरी येणेजाणे असते. ती घरात भांडणे लावते. तसेच, तिला मूळबाळ होत नाही म्हणूनही तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादित पुढे म्हटले आहे की, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजणेच्या सुमारास पतीने पीडितेला मारहाण केली. पीडितेला थायरॉईडचा त्रास आहे. तर, पती दीपक रमेश सपकाळे याने महिलेला दमदाटी करत मारहाण केलीच. परंतू, तिच्या तोंडात थायरॉईडच्या गोळ्याही कोंबल्या. त्यानंतर त्याने तीला अत्यंत निर्दयीपणे वागणूक देत खोलीत कोंडून ठेवले. (हेही वाचा, दिल्लीत हरवलेल्या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला,पोलिसांकडून तपास सुरु)
पीडितेचा आरडाओडा आणि वेदना पाहून शेजारच्यांनी पीडितेच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पीडितेच्या घरी येऊन तिची सुटका केली. पीडितेच्या नातेवाईक शांताबाई मोरे, वैजताबाई जाधव यांनी पीडितेला उपचारासाठी डॉ. निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले. त्यानंतर त्यांनी पीडितेला घेऊन पोलिसात तक्रार दिली. अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.