दिल्लीत हरवलेल्या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला,पोलिसांकडून तपास सुरु
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

दिल्ली (Delhi) येथे हरवलेल्या एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच तरुणीच्या शरीरावर विचित्र पद्धतीने वार करुन दक्षिण दिल्लीतील सरिता विहार येथे बुधवारी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, निशा कुमारी असे मृत तरुणीचे नाव आहे. निशा ही 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतली नसल्याने ती हरवली असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. मात्र बुधवारी तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन नाल्याजवळ मिळाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी पीटीआयला असे सांगितले की, निशाने तिच्या आईला ती नोकरीच्या इंटव्हूवसाठी मैत्रिण/मित्रासोबत जात असल्याचे सांगितले होते. परंतु त्या नंतर ती घरी आलीच नसल्याने घरातील मंडळींनी पोलिसात धाव घेतली. तसेच निशा घरातून निघाल्यानंतर घरातील मंडळींनी तिला 4.30 वाजताच्या सुमारासही फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा मोबाईल बंद येत असल्याचे घरातील मंडळींनी पोलिसांना सांगितले. तर या घटनेत निशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच निशाच्या गळ्याभोवती गंभीर जखम झाल्याचे आढळून आले आहे.