अहमदनगरमधील (Ahmednagar) केडगाव (Kedgaon) उपनगरातील शाहूनगर भागात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक वादातून 12 वर्षीय मोठ्या भावाने आपल्या 9 वर्षीय बहिणीची डोक्यात हातोडा मारून हत्या (Murder) केली आहे. त्यानंतर हा मुलगा घरातील लॅपटॉप व पैसे घेऊन पळून गेला. या घटनेनंतर केडगावर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, हा सर्व प्रकार घडला, त्यावेळी या भावडाचे आई-वडील बाहेर गेले होते. टीव्हीचे चॅनल बदलण्याच्या कारणातून किंवा मोबाईल खेळण्याच्या वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज शेजारील लोक व्यक्त करत आहेत. (हेही वाचा - Nagpur Suicide: अवैद्य सावकाराच्या जाचाला वैतागून एका कर्जदाराची गळफास लावून आत्महत्या; नागपूर येथील घटना)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाने आपल्या बहिणीची हत्या केल्यानंतर घरातील लॅपटॉप आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. त्याने पुणे रस्त्यावरील रॉयल हॉटेल येथे जाऊन हॉटेल व्यवस्थापकाकडे नोकरीची मागणी केली. मुलाने हॉटेल व्यवस्थापकाला आपल्याला घरच्यांनी मारहाण केल्याने आपण पळून आल्याचे सांगितले.
त्यानंतर व्यवस्थापकाने मुलाच्या वडीलांना फोन केला आणि त्याच्याबद्दल चौकशी केली. वडील घरी गेले असता त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. हा सर्व प्रकार पाहून मुलीच्या आई-वडीलांवर दु:खाच्या डोंगर कोसळला. पोलीसांनी बहिणीचा खून करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.