प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Toptamilnews)

रुग्णाला कमीतकमी वेळेत रुग्णालय पर्यंत पोहचवण्याचे काम रुग्णवाहिका (Ambulance) करते. राज्यात 108 या नंबरवर या रुग्णवाहिका रुग्णांच्या मदतीसाठी उपलब्ध होतात. मात्र अशा रुग्न्वाहीकेमधून चक्क दारूची तस्करी (Illegal Acohol Trafficking) होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुर (Chandrapur) येथे ही घटना घडली आहे. रामनगर पोलिसांनी कारवाई करत बाबुपेठ भागातून रुग्णवाहिकेतून सहा लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रुग्णवाहिकेमधून दारू तस्करी प्रकरणी राहुल वानखेडे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेले चार वर्षांपासून दारूबंदी आहे. मात्र रुग्णांना वरदान ठरत असलेल्या, त्यांना जीवदान देण्यात मदत करणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारूची अवैध तस्करी होत असेल याचा कोणी विचारही केला नसेल. मात्र याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी तपासणी करत ही दारू जप्त केली. ही दारू यवतमाळ येथून चंद्रपूरला आणली जात होत्री. (हेही वाचा: धक्कादायक : पोलीस स्टेशनमधून चक्क उंदरांनी फस्त केली एक हजार लीटर दारु)

यातील दोन आरोपी सध्या फरार आहेत. या वाहनांचे केंद्रीकृत संचालन होत असताना रूग्णाऐवजी दारू घेऊन  हे वाहन चंद्रपुरात पोचले कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे. सध्या चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यात दारूबंदी चालू आहे. मात्र यवतमाळ येथून या भागात दारूची तस्करी केली जाते. आता तर यासाठी कोणालाही संशय न येणारे वाहन, रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला आहे. पोलीस सध्या राहुलकडून याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.