केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (International Financial Services Center) मुंबईहून गुजरातला नेण्याचा निर्णय महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घेतला. मुंबईवरुन IFSC केंद्र गुजरातला हलविण्याच्या केंद्राच्या निर्णयावरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana) संपादकीयातून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. तसेच, केंद्राच्या निर्णयावरुन देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यावरही भाष्य करण्यात आले आहे. 'महाराष्ट्रावरील अन्यायाचे समर्थन कसले करता?' अशा मथळ्याखाली लिहिलेल्या या लेखात ''देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या काही उपटसुंभांकडून उपस्थित केले जात आहेत. ते चीड आणणारे आहेत. उद्या हे लोक असेही विचारतील की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय?'', असेही सामनातून भाजपला उद्देशून म्हटले आहे.
सामात संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे
- केंद्रात गुजरातला झुकते माप देणारे सरकार आहे आणि त्यातून मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गांधीनगर येथे गेले अशी भावना लोकांमध्ये आहे. हे वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गांधीनगरला कसे गेले यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते निरर्थक आहेत. देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आता एकमेकांवर जे आरोप करीत आहेत त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार?
- महाराष्ट्राच्या न्याय हक्काचा आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरील मुंबईच्या नैसर्गिक अधिकाराचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यासाठी लढण्याची जबाबदारी फक्त राज्य सरकारची म्हणता येणार नाही. किंबहुना अशा वेळी विरोधी पक्षाने सहय़ाद्रीची डरकाळी फोडायची असते. संयुक्त महाराष्ट्राचा मुंबईसाठीचा लढा विरोधी पक्षच लढला व जिंकला. हा इतिहास अमर आहे!. (हेही वाचा, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरून राजकारण पेटले; महाराष्ट्राशी ही गद्दारी का? काँग्रेस पक्षाचा भाजप नेत्यांना सवाल)
- मुंबईत आर्थिक सेवा केंद्र होणार की नाही हा प्रश्न आता नाहीच, पण असे केंद्र निर्माण करण्यात मुंबई कशी कुचकामी ठरली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या काही उपटसुंभांकडून उपस्थित केले जात आहेत. ते चीड आणणारे आहेत.
- उद्या हे लोक असेही विचारतील की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय? 105 हुतात्मे मुंबईसाठी झाले हे चूक असून ते प्लेगने मरण पावले अशी मुक्ताफळेही ते उधळतील. अशी विधाने करणाऱयांना हुतात्मा स्मारकाच्या बाजूला खांब उभारून त्यास बांधून ठेवायला हवे. इतके निर्लज्ज लोक महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्राशीच बेईमानी करतात हे कसे सहन करायचे?
दरम्यान, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हालवण्याच्या केंद्राच्या निर्णयावरुन महाराष्ट्र आणि मराठी मनामध्ये संतापाची प्रचंड लाट निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकही मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.