IAS Tukaram Mundhe आता मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्त
Tukaram Mundhe | (Photo Credit: Facebook)

ऑगस्ट 2020 मध्ये नागपूर पालिका आयुक्त पदावरून बदली करत मुंबई मध्ये दाखल झालेल्या आयएएस तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांना आता मानवी हक्क आयोगाच्या सचिव (State Human Rights Commission Secretary) पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मागील 5 महिन्यांपासून ते पदभाराविना होते. अखेर त्यांच्याकडे आता मानवी हक्क आयोगाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या बदलीच्या वेळेस मुंबईत राज्याच्या जीवन प्राधिकरण सदस्य सचिव पदी त्यांची बदली होणार होती मात्र पदभार स्वीकरण्यापूर्वीच तेथे अन्य व्यक्तीची नेमणूक झाली होती.

कोविड संकट काळात नागपूरात तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कामगिरी केली होती. लॉकडाऊनचं कडक अवलंबन त्यांनी करण्यासाठी पावलं उचलली होती. मात्र त्यानंतर नागपूरचे महापौर आणि पालिका आयुक्त मुंढे यांच्यामधील मतभेद कमालीचे वाढलेले बघायला मिळाले होते.

दरम्यान तुकाराम मुंढे हे नाव त्यांच्या सातत्याने होणार्‍या बदल्यांमुळे कायमच चर्चेमध्ये असते. मुंढे हे 2005 आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या कडक शिस्तीने होणार्‍या कामगिरींची अनेकदा चर्चा झाली आहे. दरम्यान नागपूर पालिका आयुक्त पदावरून त्यांची बदली झाली तेव्हा नागपूरकरांनी साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला होता.

काल (13 जानेवारी) दिवशी तुकाराम मुंढे यांच्यासोबतच अन्य 3 जणांचे पोस्टिंग जाहीर करण्यात आले आहे. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांना मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात नियुक्ती मिळाली. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे