कोरेगाव भीमा येथे जाऊन, पुण्यात सभा घेणारच; चंद्रशेखर आझाद यांचा निर्धार
चंद्रशेखर आझाद (Photo credit : youtube)

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या जखमा अजूनही ताज्या असताना, आझाद यांच्या आगमनाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी आझाद यांना पकडले. त्यानंतर त्यांना मालाड येथील हॉटेल मनालीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदैत ठेवण्यात आले होते. मात्र याबाबतीत अनेक सामाजिक संघटनांनी दबाव टाकल्याने त्यांची सुटका करण्यात आली. आझाद यांची मुंबई येथे सभा होणार होती, त्याला पोलिसांनी नकार दिला. त्यांनतर त्यांनी पुण्यात सभा घेण्याचे ठरवले, पोलिसांनी त्याचीही परवानगी नाकारली, त्यानंतर मी कोरेगाव भीमा येथे जाणारच आणि पुण्यात सभा घेणारच असा निर्धार आझाद यांनी बोलून दाखवला आहे.

याच वर्षी भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल उसळली होती. याबाबत अजून न्यायालयात सुनावणी चालू आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी बरीच खबरदारी घेतली आहे. म्हणूनच पोलिसांनी आझाद यांच्या सभेला परवानगी दिली नाही. तसेच भीम आर्मीच्या मालाड, दादर, शिवाजी पार्क, घाटकोपर, समतानगर, दिंडोशी येथील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मात्र आता यावर चिडलेल्या आझाद यांनी याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. कितीही अडवण्याचा प्रयत्न झाला तरी चैत्यभूमी आणि भीमा-कोरेगाव येथेही जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केल आहे. तसेच पोलिसांनी सभेला परवानगी न दिल्यास पुणे ते भीमा कोरेगाव पायीयात्रा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 58 जणांना कोरेगाव-भिमा परिसरात बंदी)

इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण होणार आहेत. हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी आंबेडकरांचे लाखो अनुयायी या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.