I-N-D-I-A Alliance Meet: 'इंडिया' आघाडीची मुंबईत बैठक; जाणून घ्या सविस्तर
INDIA Alliance (PC - Twitter)

केंद्र सरकार आणि भाजप प्रणित NDA विरोधात राष्ट्रीय पातळीवर एकवटलेल्या 'इंडिया आघाडी' (I-N-D-I-A Alliance Meet) ची एक बैठक मुंबई येथे आजपासून (30 ऑगस्ट) सुरु होत आहे. या बैठकीला देशभरातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरे यांनी केले असून संयोजनाची जबाबदारी 'महाविकास आघडी'वर आहे. ज्यामध्ये शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा समावेश आहे. या बैठकीत आज अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊन नर्णय होण्याची शक्यता आहे. खास करुन आघडीचे संयोजक तसेच समन्वय समितीमधील सदस्यांची निवड आणि बोधचिन्ह जाहीर केले जाऊ शकते.

इंडियाची तीन महिन्यांतील तिसरी बैठक

पाठिमागील तीन महिन्यांपासून बैठकाचा सलग धडाका विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीने म्हणजेच इंडियाने लावला आहे. या आधीच्या दोन बैठका अनुक्रमे पाटना आणि बंगळुरु येथे पार पडल्या आहेत. मुंबईत तिसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीत काही प्रमुख मुद्द्यांवर घमासान होऊ शकते. ज्यामध्ये शरद पवार आणि नितीश कुमार यांच्याबद्दलची चर्चा अपेक्षीत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंत खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी ते नेता असल्याचे केलेले विधान, नितीश कुमार यांच्या डोक्यात संयोजक पदाची असलेली हवा यांसह अनेक गोष्टीची जोरदार चर्चा झाली. त्यावर बैठकीत विचार होण्याची शक्यता आहे.

ईंडीया अधिक विस्तारण्याची शक्यता

बंगळुरु येथे पार पडलेल्या बैठकीत इंडियातील घटक पक्षांची संख्या 26 झाली होती. त्यात मुंबईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील काही सहकारी घटक पक्ष उपस्थित नव्हते. ते आता या बैठकीला उपस्थित राहू शकतात.

उद्धव ठाकरे यांच्याकडून मेजवानीचे आयोजन

शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांसाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्रीयन भोजनाच्या मेजवानीने बैठकीला गुरुवारी संध्याकाळी सुरुवात होईल. या बैठकीत 11 सदस्यीय समन्वय समितीच्या रचनेबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच डाव्या पक्षांना या आघाडीत स्थान कसे मिळते. संयोजनासाठी कार्यालय कोठे असेल याबाबतही उत्सुकता आहे.