Imtiyaz Jaleel (PC - ANI/Twitter)

Imtiyaz Jaleel on Aurangabad Name Change: केंद्र सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर (Sambhaji Nagar) असे केल्यानंतर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन महाराष्ट्राचे प्रमुख इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी जहरी टीका केली आहे. नामांतराला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला असून माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राज्य सरकारने रंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर (Sambhaji Nagar) आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण धाराशिव करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यानंतर शुक्रवारी केंद्र सरकारने दोन्ही शहरांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या. अशातचं आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar: औरंगाबादच्या नामांतराला खासदार Imtiaz Jaleel यांचा विरोध; काढणार भव्य मोर्चा)

इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की, इम्तियाज जलील औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. काहीजण औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार. तुम्ही इतिहासाची पानं फाडू शकता, तुम्ही एखादा बोर्ड काढून तो बोर्ड बदलू शकता. पण, इतिहास हा इतिहास असतो. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर असून वर्ल्ड हेरिटेड मॉन्यूमेंट आपल्या औरंगाबाद शहरातच आहे. स्थानिकांच्या भावना लक्षात न घेताच परस्पर नामांतरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का? असा सवालही जलील यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बाळासाहेबांचे स्पप्न पूर्ण केल्याचं म्हटलं आहे. औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव' या नावाला केंद्र सरकारने मान्यता दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री माननीय अमितभाई शाह यांचे मनःपूर्वक आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करून दाखवले, असं ट्विटर देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.