'शिवसेनेने पुन्हा निवडणूक लढवावी, भाजप तीनही पक्षांना पराभूत करेल'; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुले आव्हान
देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

आज, रविवारी नवी मुंबई (New Mumbai) येथे भाजपचे (BJP) अधिवेशन पार पडले. यावेळी माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. भीमा कोरेगाव प्रकरण (Bhima Koregaon Case) एनआयएकडे सोपविल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे आभार मानले. यासह एनआयएच्या तपासणीत सत्य उघड होईल या भीतीने शरद पवार (Sharad Pawar) याचा विरोध करत आहे, असेही ते म्हणाले. यापूर्वी शनिवारी भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्याच्या उद्धव सरकारच्या निर्णयाला कॉंग्रेसने सहमती दर्शवली नव्हती.

या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी 'भाजपमध्ये हिंमत असेल तर आजच आमचे सरकार पाडून दाखवावे' असे वक्यव्य करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

भाजप नेते फडणवीस म्हणाले की, 'जर तुमचा विश्वास असेल तर मी पुन्हा निवडणुका लढण्याचे शिवसेनेला आव्हान देत आहे. भाजप निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांना एकट्याने पराभूत करेल. तसेच शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या शिदोरी मासिकावर बंदी घालावी,' असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शरद पवार यांना लक्ष्य करताना फडणवीस म्हणाले, 'सगळया प्रकारचे पुरावे दिले तरी पवार साहेब म्हणतात एल्गार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे द्यावा, राष्ट्रीय तपास यंत्रणेमधून सत्य बाहेर येईल अशी त्यांना भीती वाटत आहे.

फडणवीस यांच्यासमवेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आघाडी सरकारला अप्राकृतिक आणि अवास्तव असे म्हटले असून यामुळे राज्याचा विकास थांबला आहे असे उद्गार काढले.

रविवारी नवी मुंबईजवळील नेरूळ येथे भाजपच्या राज्य अधिवेशनाला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, 'भविष्यात पक्षाने एकटे लढण्यास तयार राहावे, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला सरकार बनविण्याचा अधिकार होता. असे असूनही, काही लोकांनी स्वार्थाच्या हेतूने मतभेद निर्माण केले आणि सत्तेत येण्यासाठी विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली.'