Acid Attack on Wife in Mumbai: मुंबईमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. पतीने त्याच्याकडे परतण्यास नकार दिल्याने आपल्या पत्नीवर अॅसिड फेकले (Acid Attack) . या घटनेत महिलेसह तिचा 12 वर्षांचा मुलगा भाजला आहे. 24 वर्षीय महिलेने पतीकडून दारू आणि ड्रग्जच्या व्यसनाला कंटाळून घटस्फोट मागितला होता. ही महिला आणि तिचा मुलगा सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडा येथे सोमवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. महिला प्रवेशद्वाराजवळ तिच्या मुलासोबत बसली होती. तेव्हा आरोपी आला आणि त्याने तिला परत येण्याची विनंती केली. तिने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्यावर ॲसिड फेकले.
या घटनेत महिलेच्या पाठीला, पोटाला आणि खांद्याला दुखापत झाली. तसेच मुलाच्या पाठीवरही ॲसिड पडले. त्यामुळे तोही जखमी झाला. सुरुवातीला, दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे निर्मल नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला होता आणि नंतर त्याच दिवशी संध्याकाळी डीसीपी दीक्षित गेडाम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर करपे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने त्याला अटक केली. (हेही वाचा - Nagpur Acid Attack: नागपुरात माजी प्रेयसीने ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी तरुणावर केला ॲसिड हल्ला; गुन्हा दाखल, तपास सुरु)
प्राप्त माहितीनुसार, मूळ बीड येथील पीडित महिलेचे सहा वर्षांपूर्वी आरोपीशी लग्न झाले असून तिला पहिल्या लग्नापासून एक मुलगा असल्याचे समोर आले. तिचा दुसरा पती, जो सुमारे 40 वर्षांचा आहे, तो एक ऑटो चालक आहे. त्याला ड्रग्ज आणि दारूचे व्यसन होते. त्यामुळे कुटुंबात वारंवार भांडणे होत असतं. वारंवार होणाऱ्या भांडणांना कंटाळून पीडितेने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि ती आठवडाभरापूर्वी त्याच्यापासून विभक्त राहू लागली. (हेही वाचा - Punjab Acid Attack: भरदिवसा दुकानदारावर अॅसिड हल्ला, तरुण जखमी, फरार आरोपींचा शोध सुरु)
पीडित महिला भाड्याच्या खोलीत राहात असून एका केटरिंग फर्ममध्ये काम करून स्वतःचा आणि मुलाचा उदरनिर्वाह करते. घटनेच्या दिवशी, आरोपी त्याच्याकडे परत येण्याची विनंती करण्यासाठी आला, परंतु तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर ॲसिड फेकले, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी 124(1) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला (स्वेच्छेने ॲसिड वापरून गंभीर दुखापत करणे इ.) असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.