अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली (Dombivli) परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरासह अन्य एकाला अटक केली आहे. आरोपी महिलेच्या अनैतिक प्रेमसंबंधाची तिच्या पतीला कुणकुण लागली होती. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असे. यातून या महिलेने पतीच्या हत्या करून मृतदेह बदलापूर- कर्जत रोडच्या (Badlapur-Karjat Road) कडेला फेकला. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र कल्याण क्राइम ब्रांचने या महिलेचे बिंग फोडले आहे. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी लक्ष्मी पाटील, अरविंद उर्फ रविंद्र राम, आणि सनी सागर असे तिन्ही आरोपीचे नाव आहे. लक्ष्मी हिचे काही वर्षापूर्वी डोंबिवली मानपाडा येथील प्रवीण पाटील यांच्यासोबत लग्न झाले होते. प्रवीण पाटील हा खाजगी कंपनीत नोकरीला होता. तर लक्ष्मी रिक्षा चालवायची. तिथेच तिची अरविंद या रिक्षा चालकासोबत प्रेम सबंध जुळले होते. याची कुणकुण प्रविणला लागली होती. या कारणावरून प्रवीण आणि लक्ष्मीमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे या दोघांनी प्रवीणचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार, 2 रोजी रात्री सुमारास अरविंद आणि सनी या दोघांनी प्रवीणला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर तिघांचा गळा दाबून हत्या केली. तसेच त्याचा मृतदेह रिक्षात टाकून बदलापूर-कर्जत रोडच्या शेजारी टाकून दिला. हे देखील वाचा- Mumbai: मुंबईच्या मुलुंड येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू
त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लक्ष्मीने मानपाडा पोलीस ठाण्यात 4 जून रोजी प्रवीण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. परंतु, अनेक दिवस उलटले तरी प्रवीणचा शोध लागत नसल्याने त्याच्या नातेवाईकांना वेगळाच संशय आला. ज्यामुळे त्यांनी कल्याण क्राईम ब्रॅन्चकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत असताना कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाचा लक्ष्मीवर संशय बळावला. पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता चौकशी दरम्यान तिने खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने हत्येची कबूली दिली.