मुंबई: चारित्र्याच्या संशयावरुन माथेफिरु पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Image used for represenational purpose (File Photo)

डोक्यातील संशयाचे खूळ माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गळा चिरून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणधील (Kalyan) उंबर्डे परिसरात घडली आहे. रेखा असं या मृत महिलेचे नाव आहे. आरोपी विक्रम कुमार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण येथील वसंत चाळीत विक्रम कुमार आणि रेखा हे जोडपे राहत होते.गेल्या काही दिवसांपासून या दोघांत वाद सुरु होता. पत्नी रेखाचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे, असा संशय विक्रम कुमारला आला होता. म्हणून 30 ऑगस्ट रोजी विक्रमने गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकिट बुक केली होती. पण पत्नी रेखा गावी जायला तयार नव्हती, यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाली होती. या भांडणातून विक्रमने पत्नीचे हात-पाय बांधून तिचा गळा चिरुन खून केला, असं पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबई: आपल्या 30 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरचा खून केल्याप्रकरणी 20 वर्षीय युवकाला अटक; व्यभिचाराच्या संशयामधून हे कृत्य घडल्याचा संशय

खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी विक्रमचा शोध घेत आहेत. विक्रमला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत या हत्येचं मूळ कारण काय आहे ते स्पष्ट होणार नाही, असं पोलिसांचे म्हणणे आहे.