Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असलेल्या सिद्धनेर्ली नदीकिनारी चक्क चार मानवी कवट्या (Human Skull) सापडल्या आहेत. केवळ कवट्याच सापल्या असून त्याखालचा सांगाडा मात्र गायब आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विनासांगाडा कवट्या आढलल्याने हा काही घातपात किंवा अंधश्रद्धेतून केल्या जाणाऱ्या अघोरी कृत्याचा प्रकार असावा असे बोलले जात आहे. नदीकिनारचे लोक नेहमीच नदीकिनारी पोहण्यासाठी जातात. आजही ते पोहायला गेले असता त्यांना कवट्या आढळून आल्या. दरम्यान, गावच्या पोलिसपाटलांनी घटनेची दखल घेत तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला आणि कवट्या ताब्यात घेतल्या.
पाठिमागील दोन दिवसांपासून नदीपात्रात पावसाचा जोर पाहायला मिळत असला तरी, यंदा पावसाने ओढ दिली. त्यामुळे नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नदीचे पात्र बऱ्यापैकी उघडे झाले आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेल्या कवट्याही उघड्या पडल्या. दरम्यान, कवट्या आढळून आल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी दुधगंगा नदीपात्रात गर्दी केली. कवट्या पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते.
सिद्धनेर्री परिसरात काही दिवसांपूर्वीच एक परप्रांतीय भोंदू बाबा आढळून आला होता. त्यानंतर हा बाबा गायब झाला. मात्र, आता या कवट्या आढळून आल्यानंतर या बाबाचेच काही अघोरी कृत्य तर नसावे ना? अशी चर्चा परिसरात रंगली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या की घडलेला अपघात याबाबत अद्याप तरी कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे सिद्धनेर्ली आणि बामणी परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.