(संग्रहित प्रतिमा)

मुंबई: डिस्ट्रिक हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेनेला जबरदस्त दणका बसला आहे. तर, भाजपने जोरदार मुसांडी मारली आहे. या निवडणुकीत शिवसेना प्रणीत शिवप्रेरणा पॅनलचा धुव्वा उडाला. विशेष म्हणजे शिवसेनेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्याउलट भाजपचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह विमान होते. दरम्यान, या पराभवानंतर शिवसेनेचे विमान उडालेच नाही, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, भाजपने ही निवडणूक आमदार प्रवीन दरेकर आणि शिवाजी नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढली. भाजपच्या स्व. रघुवीर सामंत पॅनलने मोठा विजय मिळवला. रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात ही निवडणूक पार पडली.

दरम्यान, शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, शिवसेनेला या निवडणुकीत साधे खातेही उघडता आले नसल्याची खोचक प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.