हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मृत्यूशी झुंज देण्याऱ्या पीडित तरुणीला मुख्यमंत्रीनिधीतून मदत जाहिर
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

वर्धा मधील हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारीला सकाळच्या वेळेस कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडललेल्या एका तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचे सांगण्यात येत असून आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पण तरुणी गंभीररित्या भाजली असून तिची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधीमधून तरुणीवर उपचार केले जाणार असल्याचे जाहिर केले आहे.

पीडित तरुणी ही एका महाविद्यालयात शिक्षिका असून ती सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाली होती. त्यावेळी आरोपी पीडितेच्या मागावर होता. पीडित तरुणी हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. त्यानंतर काही वेळेतच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर स्थानिकांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केले आहे. विकेश नगराळे असे आरोपीचे नाव आहे.(वर्धा: शिक्षिकेला जिंवत जाळणाऱ्या आरोपीला फाशी द्या, सर्वपक्षीयांकडून 'हिंगणघाट बंद'ची हाक)

तर पीडितेवर केलेल्या अन्याया प्रकरणी आरोपीला फाशी द्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर सोमवारी हिंगणघाट येथे सर्वपक्षीय नेत्यांकडून या प्रकाराचा निषेध करत बंदची हाक देण्यात आली होती. तर न्यायालयात पीडितेची बाजू शासकिय वकिल उज्ज्वल निकम मांडणार असून येत्या 8 फेब्रुवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.