
नुकतेच पुण्यात जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी‘आणि 'स्मरणरम्य दिनदर्शिके’चे प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ‘आठवणीतील पुणे’ या विषयावर शरद पवार व श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘पुण्यात शिकताना विविध महाविद्यालयीन निवडणुका 'पवार पॅनेल'च्या माध्यमातून लढविल्या. आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत आहेत. पण पुण्याच्या त्या निवडणुका हाच माझ्या राजकारणाचा पाया आहे,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी मत व्यक्त केले.
या मुलाखतीदरम्यान पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का, या प्रश्नाावर पवारांनी 'आता निवडणूक नाही', असे म्हणत आगामी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली असल्याचे सांगितले. पुढे या प्रश्नावर पवारांनी काही बोलायचे टाळले, या वक्त्यव्याद्वारे शरद पवार यांनी राजकीय कारकिर्दीमधून निवृती घेत असल्याचे संकेत दिले गेले असावेत असे जाणवले.
शिक्षण घेत असताना शरद पवार यांनी त्यांच्या आयुष्याची फार महत्वाची वर्षे पुण्यात व्यतीत केली. त्या सर्व आठवणी लोकांसमोर मांडताना, एण्डला जाऊन पाहिलेला इंग्लिश सिनेमा, महिन्याकाठी घरून मिळणाऱ्या पैशाच्या शिलकीतून कासमशेठच्या खिम्याची मेजवानी, 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान शहरात काढलेला विद्यार्थ्यांचा मोर्चा, गदिमा, पुलं आणि बाबूजींशी असलेले नाते, कामशेतचे फुटलेले धरण, पवारांच्या सूचनेनुसार श्रीनिवास पाटील यांनी राजीनामा देत राजकारणात केलेला प्रवेश, अशा विविध आठवणींमध्ये शरद पवार आणि श्रीनिवास पाटील रममाण झाले होते.