एका वर्षात पुणेकरांनी भरला तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

पुण्यात (Pune) 1 जानेवारीपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती (helmet compulsory) करण्यात आली होती. या हेल्मेट सक्तीला येत्या 1 जानेवारी एक वर्ष पूर्ण होणार आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी 16 लाख दुचाकी स्वरांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि प्रत्यक्ष चौकात थांबवून ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नागरिकांनी हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवत अनेक मोर्चे काढले. मात्र, तरीही पुणे वाहतूक पोलीस हेल्मेट कारवाईवर ठाम राहिले. हेल्मेट सक्तीबाबत जुन्या सरकारने घेतलेले निर्णय नव्या सरकारने रद्द करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी 2019 पासून शहरात दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू केली होती. याला पुण्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता. तरीदेखील वाहतूक पोलिसांनी आपल्या नियमात बदल केला नसून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर योग्य ती कारवाई केली. दरम्यान, पुणे वाहतूक पोलिसांनी 16 लाख दुचाकी स्वारांवर कारवाई करत तब्बल 84 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत यातील 21 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर दुचाकी स्वारांना हेल्मेट बंधनकारक केले. त्यानंतर पुण्यात ही कारवाई तीव्र करण्यात आली. हे देखील वाचा- आता गोरगरिबांना मिळणार 10 रुपयांत शिवभोजन; शिवसेना पक्षाच्या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता

दरम्यान, वाहतूक पोलीस केवळ 100 कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप हेल्मेट विरोधी कृती समितीने केला आहे. तसेच महाराष्ट्रातील आलेल्या नव्या सरकारसोबत याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, यासाठी भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यावर पोलिसांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.