Mumbai Rains Update: मुंबईत रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची कोसळधार, अनेक भागांत वॉटर लॉगिंगची समस्या
Mumbai Rains Update (Photo Credits: ANI/Twitter)

Mumbai Rains Update Today: मुंबईत काल रात्रीपासून पावसाने धुडगूस घातला असून आज सकाळपर्यंत रात्रीपासून पडणा-या या मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली आहे. आज पहाटेपासून भांडूप, कांजूर, मुलूंड परिसरात जोरदार विजांचा कडकडाटाने या परिसरात घबराट पसरली होती. तर सायन पुल, दादर हिंदमाता, अंधेरी सबवे या परिसरात देखील पाणी रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळाले. काल रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून आज सकाळी मुंबईत अनेक भागात धो-धो पाऊस कोसळत आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईत अनेक भागांत गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये नेहमीप्रमाणे गुडघाभर पाणी साचलेले पाहायला मिळाले.हेदेखील वाचा- Maharashtra Monsoon Update: मुंबई, ठाण्यासह कोकणात पुढील 5 दिवसांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; काळजी घेण्याचे IMD चे आवाहन

पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोरदार पावसामुळे वाहनांची वर्दळ कमी दिसली.

दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने काल संध्याकाळपासून कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात हजेरी लावली. रात्रीपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे.

कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे येथे मागील 2 दिवसांपासून धुव्वाधार पाऊस होत आहे. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचे असणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आणि त्याचा पश्चिमेकडील प्रवास यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील 4-5 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसासह जोरदार वारे देखील वाहतील. परिणामी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.