महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) दाखल होताच त्याने धुमशान घालायला सुरुवात केली आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे येथे मागील 2 दिवसांपासून धुव्वाधार पाऊस होत आहे. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचे असणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आणि त्याचा पश्चिमेकडील प्रवास यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील 4-5 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसासह जोरदार वारे देखील वाहतील. परिणामी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पुढील 3 दिवसांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसंच मुंबई, ठाण्याला रविवार (13 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये पावसाची तीव्रता रोज वाढत जाईल. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. (मुंबईत मागील 24 तासांत कुलाब्यात 23.4 मिमी पावसाची नोंद)
K S Hosalikar Tweet:
येत्या 5 दिवसात कोकण मध्ये अत्यंत तीव्र मुसळधार पावसाची शक्यता.
काळजी घ्या
रेड इशारा आज रत्नागिरी, रायगड साठी
रविवारी, मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरी...
IMD ची वेबसाइट पहा
-IMD pic.twitter.com/14gLn1r9gV
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2021
तसंच गरज असल्याच घराबाहेर पडा अन्यथा घरात राहूनच विकेंड साजरा करण्याचा सल्ला मुंबईकर आणि ठाणेकरांना देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर नागरिकांनी समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.