Heavy Rainfall in Aurangabad: कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी, कन्नड घाटात दरड कोसळून वाहने अडकली, औरंगाबाद मध्ये पूर
Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

औरंगाबाद (Heavy Rainfall in Aurangabad) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. कन्नड (Kannad) घाटात चार ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळलेला मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करवा असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीसगाव- कन्नड तालुक्याच्या सीमा परिसरात ढगफुटी झाली आहे. ढगफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे भलदारी पाझर तलाव फुटला आहे. त्याचा परिणाम पूरात होऊन कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टीचा इशारा (Maharashtra Weather Forecast) आगोदरच दिला होता.

औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी शेतं पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी घरांमध्ये, दुकानांमध्येही पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मदत पोहोचवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत त्या ठिकाणी रस्त्यांवरील दगड-मातीचा ढिगारा हटविल्याशिवाय वाहतूक पूर्ववत होणार नाही. त्यामुळे या रस्त्यांचा वापर टाळावा, असे अवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील कोदगाव आणि वलथान ही धरणं काटोकाठ भरली आहेत. धरणांच्या सांडीतून पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. परिणामी चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग ठप्प झाला आहे. (हेही वाचा, Maharashtra Rains: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांना Orange, Yellow Alert)

दरम्यान, आवश्यक ठिकाणी मदतकार्य सुरु झाले असून नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हालविण्यात येत आहे. सदर बाजार, देवळीवाडा आणि भीमनगर भागातील भिल्ल वस्तीत पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीर मुसा कादरी दर्गा, शिवाजी घाट परिसरात असलेली चाळीसगावातील काही दुकाने पाण्यासोबतच वाहून गेल्याचे वृत्त आहे. या पाण्यासोबत दुकाने आणि काही नागरिकही वाहून गेल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मुंबई, मुंबई उपनगरं आणि उर्वरीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताआहे. हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार ही पुढील 24 तास ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. या काळात काही ठिकाणी 15cm किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होऊ शकते असा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये यलो (Yellow Alert) तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.