Maharashtra Weather Update: मान्सून देशातून माघार घेण्याच्या तयारीत असल्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून हंगाम संपण्यापूर्वी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) वर्तवला आहे. महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. IMD ने मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात विखुरलेल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरात तसेच पुणे शहरात मंगळवारी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
उद्या अनंत चतुर्थी (Anant Chaturthi 2024) असल्याने पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. हवामान अंदाजानुसार, अनंत चतुर्दशीच्या पुण्यात ढगाळ आकाश असून दुपारी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन भाविकांनी बाहेर जाण्याचे नियोजन करावे. महाराष्ट्राशिवाय देशभरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. IMD ने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तीव्र पावसाचे संकेत देत रेड अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा -Anant Chaturdashi 2024: गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज, 23,400 अधिकारी तैनात; ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षेत वाढ)
कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा -
राज्यात अलीकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, आज हवामान खात्याने कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. IMD नुसार, बंगालच्या उपसागरावर एक अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज ते स्थिर राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्याच्या बहुतांश भागांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता -
तथापी, 18 सप्टेंबरपासून कोकण आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 19 सप्टेंबरपासून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात, 16 सप्टेंबरपासून काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असून, 18 आणि 19 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 2-4 दिवस कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी दररोज पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.