Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Rain Update: पाऊस यंदा फारशी विश्रांती घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. पाठिमागचे तीन-चार दिवस पावसाने चांगलेच झोडपून (Heavy Rainfall) काढल्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) पुन्हा इशारा दिला आहे. आयएमडीने (IMD) म्हटले आहे की, येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात हलक्या, ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट (मध्यम ते मुसळधार पाऊस) जारी केला आहे.

आयएमडी अधिकारी केएस होसाळीकर यांनी म्हटले आहे की, दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात (Coastal Region of South Odisha) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ते पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण करत आहे. परिणामी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे चार ते पाच दिवस मान्सून चांगलाच सक्रीय राहणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. या मान्सूनच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर आणि रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा यासह राज्यातील इतर भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई यलो अलर्ट (हलका ते मध्यम पाऊस) देण्यात आला आहे. मात्र, पावसाची तीव्रता आणि बदलती नैसर्गिक स्थिती पाहून त्यात बदल केला जाईल, असेही हवामान विभाने म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Updates: मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी मध्ये काही भागात पुढील 3-4 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा - IMD Mumbai)

हवामान विभागाने म्हटले आहे की, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुढचे पाच दिवस ऑरेंज अलर्ट असेल. तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट असेल. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यासोबतच कोकणातही अशीच स्थिती आहे. मुंबईसाठी पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसण्याची शक्यता.

अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस आज जोरदार बॅटींग करण्याची शक्यता आहे. नांदेड हिंगोली यांसह इतर ठिकाणीही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मराठावाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे अवाहन केले जात आहे.