Health Department Recruitment: 15 लाखांसाठी लीक केला आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर; विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह 5 जणांचा अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी (Maharashtra Health Department Recruitment Exam Paper Leak) पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी सुरू आहे. ताज्या प्रकरणात आरोग्य विभागातील उच्च अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात सायबर सेलला यश आले आहे. सायबर सेलने लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (आरोग्य अधिकारी, मेंटल हॉस्पिटल, बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (जि.प. शिक्षक, बीड), शाम महादू मस्के (बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (लिपिक, उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे.

या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 11 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. सायबर सेलच्या तपासात लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांनी प्रश्नपत्रिका देण्यासाठी त्यांच्याच विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड यांच्याकडून 10 लाख रुपये आणि हवालदार शाम महादू मस्के यांच्याकडून 5 लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

आता आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांच्याकडे आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कशा आल्या, याचा तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत. 31 डिसेंबर रोजी आरोग्य विभागातील गड ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षा पार पडली. परंतु त्याआधी या परीक्षेचा पेपर लीक झाला होता. प्रश्नपत्रिकेतील 92 प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते. याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा: महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री ईडीच्या जाळ्यात; प्राजक्त तनपुरे यांची चौकशी)

त्यावरुन सायबर पोलिसांकडून तपास सुरू होता. याबाबत चार दिवसांपूर्वीच जालन्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशी माहिती बाहेर येत गेली व आता आज 5 जणांचा अटक करण्यात आली. या प्रकरणी आता पर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.