भाजपचे आमदार नितीश राणे आणि गीता जैन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. जानेवारीत ठाणे जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी दोघांनीही आक्षेपार्ह भाषण केल्याचे तपासादरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात संबंधित पोलिस आयुक्तांना या दोन्ही नेत्यांनी आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषणे केली होती का, याची वैयक्तिक पडताळणी करण्यास सांगितले होते. (हेही वाचा - Bombay HC On Look Out Circulars: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ‘लूक आउट परिपत्रक’ जारी करण्याचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा)
या वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी राणे आणि जैन यांनी दिलेली भाषणे अपमानास्पद होती, असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज न्यायालयाला सांगितले. राणेंवर मुंबईतील मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर भागातील सभांमध्ये द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे. तर, जैन यांच्यावर मीरा भाईंदरमधील सभेत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे.
खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जून रोजी निश्चित केली. या वर्षी जानेवारीमध्ये ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे राणे, जैन आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. या याचिकांमध्ये दावा करण्यात आला आहे की, या भागातील जातीय हिंसाचारानंतर ही भाषणे देण्यात आली होती. याचिकांमध्ये आमदारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती करण्यात आली होती.