हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला, घरासमोरील गाड्या फोडल्या
हर्षवर्धन जाधव (Photo Credits-Facebook)

कन्नडचे माजी आमदार आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले. यावरुन शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून जाधव यांचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. जाधव यांच्या या प्रकारानंतर त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे.उद्धव ठाकरे यांच्यावर निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर खालच्या पातळीला जाऊन टीका केली. त्यावेळी जाधव यांनी असे म्हटले की, शिवसेना मुस्लिमांच एवढं वावडं आहे तर सत्तार यांना पक्षात का घेतले असा सवाल उपस्थित करत ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले.

हर्षवर्धन जाधव हे कन्नड मतदारसंघातून अपक्ष म्हणून यंदाच्या विधानसभेसाठी रिंगणात उतरले आहेत. तर निवडणूकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु असतानाच जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान फारच वादग्रस्त ठरले आहे. अब्दुल सत्तार यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी निवडणूकीपूर्वीच काँग्रेसला अलविदा करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीत जागा वाटपाच्या वेळी सत्तार यांना सिल्लोड येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सत्तार यांना शिवसेनेने तिकिट दिल्याने जाधव यांनी पक्षाच्या नेतृत्वावर जहरी टीका केली आहे.('मुसलमानांचं इतकंच वावडं आहे तर मग सत्तार तुमच्या आईचा....!'; शिवसेना नेतृत्वावर टीका करताना हर्षवर्धन जाधव यांची जीभ कमालीची घसरली)

महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. तर निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लावण्यात येणार असल्याने कोणता पक्ष बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण शिवसेना-भाजप महायुतीने जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार 124 शिवसेना आणि भाजप 150 व मित्रपक्ष 14 जागांवर निवडणूक लढवणार आहेत.