Hardik Patel: 'नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी पक्षात माझी अवस्था', हार्दिक पटेल काँग्रेसवर नाराज
Hardik Patel | (Photo Credits: Facebook)

गुजरात विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) तोंडावर आल्या आहेत. असे असताना पाच राज्यांत पराभवाचा धक्का सहन कराव्या लागलेल्या काँग्रेसला (Congress) गुजरातमध्येही पक्षांतर्गत धुसफुसीला सामोरे जावे लागणार असे दिसते. गुजरात काँग्रेसचे (Gujarat Congress) कार्यकारी अध्यक्ष आणि तरुण तडफदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले असून आपली नाराजी स्पष्ट व्यक्त केली आहे. 'काँग्रेस पक्षात आपली स्थिती नव्याने लग्न केलेल्या नवऱ्याची नसबंदी केल्याप्रमाणे झाली आहे', असे म्हणत हार्दिक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलासा दिल्याने निवडणूक लढवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे गुजरात काँग्रेसमध्ये सर्वच काही अलबेल नसल्याचे चित्र आहे.

हार्दिक पटेल यांनी स्वपक्षावरच हल्ला करत म्हटले आहे की, नव्याने लग्न केलेल्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी पक्षात माझी अवस्था झाली आहे. हार्दिकने खोडालधाम ट्रस्टचे अध्यक्ष आणि ताकदवान पाटीदार नेता नरेश पटेल यांच्यावरुनही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नरेश पटेल यांना अनेक राजकीय पक्षांकडून प्रलोभणे दाखवली जात आहे. असे असताना काँग्रेसने त्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचेही हार्दिकने म्हटले आहे. हार्दिक पटेल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Gujarat Election: हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, निवडणूक लढविता येणार, शिक्षेला स्थगिती)

हार्दिक यांनी खंत बोलून दाखवली आहे की, मला पीसीसी बैठकीला निमंत्रण दिले जात नाही. पक्षपातळीवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मला विचारले जात नाही. जर असेच निर्णय घ्यायचे असतील तर मला दिलेल्या पदाचा उपयोग काय? पक्षाने नुकताच 75 नव्या महासचिव आणि 25 नव्या उपाध्यक्षांची घोषणा केली. या वेळी मझे मतही विचारण्यात आले नाही. यादीतून एखादा मोठा नेता राहिला आहे का? असेही मला विचारले गेले नसल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

पाठिमागी निवडणुकीत गुजरात सरकारविरोधात यशस्वी आंदोलन उभा केल्यानंर काँग्रेस नेतृत्वाने हार्दिक यांना 2020 मध्ये गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमण्या आले होते. दरम्यान, पाटिदार आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी यांच्याकडून मोठी जबाबदारी दिली गेली नसल्याबद्दलही खंत व्यक्त केली.