Gujarat Election: हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, निवडणूक लढविता येणार, शिक्षेला स्थगिती
Hardik Patel | (Photo Credits: Facebook)

पाटीदार आंदोलनातून (Patidar Andolan) पुढे आलेले आणि सध्या काँग्रेस पक्षात असलेले नेते हार्दीक पटेल (Hardik Patel) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलास दिला आहे. हार्दिक पटेल यांच्या याचिकेवर आज (मंगळवार, 12 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने प्रकरणाचा अंतीम निर्णय येईपर्यंत हार्दिक पटेल यांना देण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. पाटीदार आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरवले होते. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार दोषी ठरवलेला व्यक्ती निर्दोष सिद्ध होई पर्यंत निवडणूक लढवू शकत नाही.

गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. ही याचिका लोकसभा निवडणूक 2019 मध्येच दाखल केली होती. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणीही पटेल यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे हार्दिक पटेल निवडणूक (लोकसभा) लढवू शकले नव्हते. (हेही वाचा, काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक)

हार्दिक पटेल आता आगामी काळात होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरु पाहात आहेत. त्यामुळे त्यांनी हालचाली वाढवल्या होत्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हार्दिक पटेल यांचे वकील मनिंदर सिंह यांनी म्हटले की, शिक्षेच्या नावावर निवडणूक लढविण्यापासून एखाद्या नागरिकाला दूर ठेवणे हे कोणत्याही भारतीय नागरिकाच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते (हार्दिक पटेल) निवडणूक लढविण्याची एक मोठी संधी गमावली आहे. ते कोणत्याही प्रकारे गुन्हेगार नाहीत. पोलिसांनी अधिकारांचा आणि कायद्याचा गैरवापर करत त्यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.