मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

सलगच्या सु्ट्टीनंतर आज कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशाना रेल्वेच्या (Mumbai Local) ढिसाळ कारभारामुळे मनस्ताप हा सहन करावा लागला आहे. रेल्वेच्या हार्बर मार्गावर (Harbour Railway) 42 तासांच्या मेगाब्लॉकनंतरही प्रवाशांचे हाल सुरुच आहेत.  पनवेल येथे सकाळी 5.35 ते 7.25 या वेळेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बरमार्गावरील गाड्या उशीराने धावत आहे. पनवेलकडे जाणार्‍या हार्बर आणि ट्रान्सहार्बर (Trance Harbour Local) उपनगरीय गाड्या बेलापूर-पनवेल (Belapur - Panvel) दरम्यान 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. वाशी आणि बेलापूरकडे जाणाऱ्या गाड्या योग्य वेळेत धावत आहेत.  (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: मुंबईसह पुणे, ठाणे कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा)

हार्बर मार्गावरील सीएसएमटी आणि डाऊन पनवेल दिशेच्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. कामाचा दिवस असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर होती. पनवेल स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर लोकल व्यवस्था कोळमडली आणि लोकल ट्रेन सुमारे अर्धा तास उशीराने धावत होत्या. यामुळे आज कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येही लेटमार्क मिळाला.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता या मार्गावर पाच दिवसांचा ब्लॉक घेणार आहे. २ ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे.