ठाण्यामध्ये (Thane) शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरुन शिंदे गटातील महिलेंनी मारहाण केली होती. शिंदे गटातील (Shinde Group) महिलांनी केलेल्या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshani Shinde) या जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital And Research Centre) हलवण्यात आले आहे. रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे. ठाण्यातील संपदा रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये रोशनी शिंदे यांना गंभीर दुखापत झाले नसल्याचे तसेच त्या गर्भवती नसल्याचे सांगण्यात आले होते. सध्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट देखील घेतली होती. (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'फडतूस गृहमंत्री लाळघोटेपणा करत 'फडणवीसी' करत फिरतो', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल)
ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून सोमवारी संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. मात्र अद्यापही या प्रकरणी कोणतीच कारवाई झालेली नाही आहे.
दरम्यान सोमवार 4 एप्रिल रोजी संध्याकाळी रोशनी शिंदे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कासारवडवली पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांच्या तक्रारीवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे. तर रोशनी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी भाजप पदाधिकारी संजय वाघोले यांनी देखील गुन्हा दाखल केला आहे.