Rebel MLAs Paid Guwahati Hotel Bills: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर बंडखोर आमदारांनी गुवाहाटी (Guwahati) येथील हॉटेलचे बिल भरले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल (Radisson Blu Hotel) मध्ये आठ दिवस मुक्काम ठोकून होते. हॉटेल कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी चेक आऊट करताच या लोकांनी त्यांची बिले काढली होती. कर्मचार्यांनी बिलाची रक्कम जाहीर केली नसली तरी ही रक्कम 68 ते 70 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या हॉटेलच्या सर्व 70 खोल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी या हॉटेलमध्ये बाहेरील लोकांसाठी इतर सुविधांवर 22 ते 29 जून या कालावधीत बंदी घालण्यात आली होती. हॉटेलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, महाराष्ट्रातील आमदार सामान्य पाहुणे म्हणून हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी हॉटेल सोडण्यापूर्वी त्यांची बिले भरली. मात्र, त्यांनी बिलाची नेमकी रक्कम सांगण्यास नकार दिला. (हेही वाचा - Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: पक्ष सोडून गेलेली व्यक्ती 'शिवसेनेचा मुख्यमंत्री' होऊ शकत नाही; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा)
जेवणावर 22 लाख रुपये खर्च -
हॉटेलच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, आमदार ज्या रुममध्ये थांबले होते त्या रुम्स सुपीरियर आणि डिलक्स श्रेणीतील होत्या. Radisson Blu च्या वेबसाइटनुसार, गुवाहाटी शाखेच्या खोल्यांचे भाडे जवळजवळ दररोज बदलते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्यत: सुपीरियर रूमचे भाडे सुमारे 7500 असते आणि डिलक्सचे दररोज 8500 रुपये असते. सवलत आणि करानंतरची एकूण रक्कम सुमारे 68 लाख रुपये आहे. हॉटेलमध्ये काही उत्कृष्ट आणि सुमारे 55 डिलक्स खोल्या आहेत. त्याचबरोबर बंडखोरांचे जेवणाचे बिल सुमारे 22 लाख रुपये आल्याचे समजते.
हॉटेल कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले की, येथे राहणाऱ्या आमदारांनी इतर कोणत्याही सशुल्क सेवेचा लाभ घेतला का? यावर कर्मचार्यांनी सांगितले की, आमदारांनी केवळ कॉम्प्लीमेंट्री सुविधांचा लाभ घेतला आहे. याशिवाय स्पा किंवा अन्य कोणत्याही सेवेचा लाभ घेतला नाही. 22 जून रोजी मुंबईपासून सुमारे 2700 किमी अंतरावर असलेल्या या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एन्ट्री केली होती. बुधवारी या आमदारांनी हे हॉटेल सोडले. रॅडिसन ब्लू हॉटेल हे एक पंचतारांकित हॉटेल आहे.