Shiv Sena Criticizes BJP: गुजरात प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, मग मुख्यमंत्री बदलण्याची वेळ का आली? शिवसेनेची भाजपवर टीका
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

गुजरात विधानसभा निवडणूक एक वर्षावर असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात थिणगी पडली असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला (BJP) धारेवर धरले आहे. यातच शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र 'सामना' मध्ये (Saamana) प्रकाशित झालेल्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. जर गुजरात राज्य विकास आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, मग मुख्यमंत्री बदलण्याची वेळ का आली? असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विजय रूपाणी हे मुख्यमंत्री असताना त्यांना योग्यरित्या परिस्थिती हाताळता आली नाही. त्यांच्या कामगिरीवर लोक नाराज होते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे आहेत. या समाजातील लोक नाराज असल्यामुळे पटेल यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. पटेल गेल्या चार वर्षांत मंत्रीही झाले नाहीत. परंतु, त्यांना थेट मुख्यमंत्री बनवण्यात आले. जर गुजरात राज्य विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग मुख्यमंत्री बदलण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अग्रलेखातून विचारण्यात आला. तसेच लोकशाही, शासन आणि विकासाच्या गुजरात मॉडेलचा फुगा अचानक बुडबुड्यासारखा फुटला, असाही भाजपला टोला लगावण्यात आला आहे. हे देखील वाचा- Chandrakant Patil On Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता; 'मुका' विधानावर चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण

"जेव्हा एखाद्या राज्याला विकासाचे किंवा प्रगतीचे 'मॉडेल' सिद्ध करण्यासाठी फेरफार केला जातो, तेव्हा अचानक नेतृत्व बदलल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होते. गुजरातची जबाबदारी आता भूपेंद्र पटेल यांच्यावर आली आहे. पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पटेल यांना पुढे ठेवून निवडणूक लढावी लागणार आहे. यालाच गुजरात मॉडेल म्हटले जात आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

अहमदाबादजवळ स्थित, फोर्ड वाहन निर्मात्यासह काही मोठ्या कंपन्यांनी आपला गाशा गुंडळल्याने हजारो लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला शेतकरी, मजूर, बेरोजगार युवक संपूर्ण गुजरातमध्ये संताप व्यक्त करत आहेत, त्याचा परिणाम निवडणुकांवर होणार आहे. हे लक्षात येताच मुख्यमंत्री रुपाणी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली, असेही अग्रलेखात म्हटले आहे.