 
                                                                 मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणतात, ‘आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवूया. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.'
'कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…,'अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांना, जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचं संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. (हेही वाचा: गुढीपाडव्यानिमित्त Wishes, Greetings, WhatsApp Quotes, Images शेअर करू साजरे करा मराठी नववर्ष!)
'कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे. हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो,' असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
