नांदेड: अंगावर वीज पडल्याने आजोबा आणि नातवाचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. संपूर्ण राज्यातील खरीपाची पिके वाया गेली आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पिकाचे नुकसान झाले असले तरी शेतकरी मात्र शेतात दम धरून पिकाची काढणी करत आहे. नांदेड जिल्ह्यात मरखेल परिसरातील टाकळी जहांगीर येथे शुक्रवारी वीज कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे. हे दोघे शेतातील सोयाबीनची रास घालत होते. त्यावेळी ही घटना घडली.

चंदररेड्डी इररेड्डी बोप्पावाड (वय 60) व त्यांचा नातू योगेश गोपाळरेड्डी बोप्पावाड हे दोघे शुक्रवारी रोजी दुपारी स्वतःच्या शेतातील सोयाबीन पिकांची रास करण्यासाठी शेताकडे गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास वीज अंगावर पडून या दोघांचा मृत्यू झाला. मरखेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी या परिसरात वीजांच्या कडकडांसह पाऊस झाला.

हेही वाचा - कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

राज्यात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाले आहेत.  सोलापूरमध्ये तीन दिवसांपूर्वी बीबीदारफळ येथील समृद्धी संतोष साठे (वय 9) ही मुलगी वीज अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडली होती. ऐन भाऊबीजे दिवशी समृद्धीचा मृत्यू झाला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेली समृद्धी सुट्टी असल्याने आईसोबत शेतात गेली होती. दुपारी साडेतीन वाजता वीजेचा कडकडाट व पाऊस सुरू होता. समृद्धी ज्या झाडाखाली थांबली होती, त्याच झाडावर वीज पडली. वीजेच्या धक्क्याने समृद्धी खाली कोसळली. उपचारासाठी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे जाहीर केले.