कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर रखडलेला ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election 2020) कार्यक्रम पुन्हा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक (Nashik District ) जिल्ह्यातील सुमारे 102 गावांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य आले आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तर काही ग्रामपंचायती मुदत संपण्याच्या स्थितीत आहे. अशा जवळपास 102 ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचा (Gram Panchayat Election) धुरळा उडणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकांबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मात्र मागवला आहे. आता निवडणूक आयोगानेच अहवाल मागितला आहे म्हटल्याची कुककूण लागताच गावागावांतील पारांवर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
राज्यात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लटकला
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे अशा जवळपास 1,566 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या ग्रामपंचायतींमध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण (29), येवला (25), दिंडोरी (44), इगतपुरी (4) या तालुक्यांतील 102 ग्रामपंचायतींचा समावेश होता. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 31 मार्च या दिवशी मतदान आणि 1 एप्रिल 2020 या दिवशी मतमोजणीही होणार होती. त्यासाठी 6 मार्चपासून नामांन अर्जही दाखल करण्यात आले. परंतू, नामांकन अर्जांची छाननी सुरु असतानाच कोरोना व्हायरस संकटाचे देशभरात आव्हान वाढले आणि निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळाली. (हेही वाचा, Devendra Fadnavis: मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केले केलं जातंय- देवेंद्र फडणवीस)
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे अनेक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाला त्याला आता प्रदीर्घ काळ उलटून गेला. आता महाराष्ट्र अनकॉक प्रक्रियाही सुरु झाली. त्यामुळे आता ज्या ग्रामपंचायत हद्दींमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव कमी आहे. अशा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेता येते का याबाबत चाचपणी सुरु असल्याचे समजते. निवडणूक आयोगाने त्याबाबत अहवाल मागवला आहे. अहवाल 21 सप्टेंबरपर्यंत पाठवावा अशा सूचनाही आयोगाने केल्या आहेत.
दरम्यान, सध्यास्थितीत अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आला आहे. ग्रामपंचायतींमधले प्रशासकीय काम अडत नसले तरी, गावकरी मात्र ग्रामपंचायत निवडणूक केव्हा होणार आणि गावाला सरपंच केव्हा मिळणार याकडे डोळे लाऊन आहेत.