राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना
Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

साकीनाका बलात्कार प्रकरणाची (Mumbai Sakinaka Rape Case) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी दखल घेतली आहे. कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी सूचनाही राज्यपालांनी राज्य सरकारला केली आहे. राज्यपालांनी याबाबत एक पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिले आहे. दरम्यान, राज्यपालांनी केलेली सूचना मान्य करत मुख्यमंत्री दोन दिवसांचे अधिवेशन बोलावणार का? याबाबत उत्सुकता आहे.

राज्यपालांच्या सूचनेवर राजकीय वर्तुळातून आणि राजकीय अभ्यासकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दखल घेऊन सूचना करणे म्हणजे राज्यपालांनी एक प्रकारे राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप वाढविल्याचे चिन्ह असल्याचे काही अभ्यासकांना वाटते. तर, प्रसारमाध्यमांनी महाविकासआघाडीतील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात राज्य सरकार अशा प्रकारचे अधिवेशन घेण्याची शक्यता सूतराम कमी असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, महिलेचा जबाब घेता आला नाही- मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे)

राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आता लपून राहिला नाही. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन निर्माण झालेला वाद अद्याप कायम आहे. राज्यपालांनी या आधीही राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. तसेच राज्य सरकारकडूनही राज्यपालांना तसेच उत्तरही (पत्राद्वारे) देण्यात आले आहे. दरम्यान, 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन निर्माण झालेल्या वादावर राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्यपालांना स्मरणपत्र लिहिले होते. दुसऱ्या बाजूला राज्यपालांनीही पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवण राज्य सरकारला करुन दिली होती. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष येत्या काळात आणखीच गडद होण्याची शक्यता आहे.

काय आहे साकीनाका बलात्कार प्रकरण?

साकिनाका बलात्कार प्रकरणात मृत्यू झालेली महिला अवघी 32 वर्षांची आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना 10 सप्टेंबरला पुढे आली होती. मुबईतील साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली. मोहन चौहान असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विरोधात पोलिसांनी भादंसं कलम 307,376, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडित महिलेच्या मृत्यूनंतर 302 अन्वये हत्येच्या आरोपाचा गुन्हाही पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केला असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले होते.