
राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विधानसभा सदस्य ॲड. आकाश फुंडकर, डॉ. देवराव होळी, पंकज भोयर यांनीही प्रश्न उपस्थित केले.
मंत्री देसाई म्हणाले की, अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. ड्रोनच्या सहाय्याने अवैध दारुची दुकाने कुठे सुरु आहेत याची माहिती घेण्यात येत आहे. याशिवाय वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांची संख्याही 12 वरुन 25 करण्यात आली आहे. नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री इत्यादी बाबत तक्रार करण्यासाठी व्हॉटसअप क्रंमाक आणि टोल फी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शिवाय राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून हा अहोरात्र कार्यरत असतो.
येणाऱ्या काळात महसूल, गृह आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची एक समिती करुन स्थानिक पातळीवर सदर समिती अवैध मद्याची वाहतूक रोखणे यासाठी अधिक काम करेल. वर्धा जिल्ह्यातील अनधिकृत मद्य कारखान्यांबाबतची माहिती घेऊन याबाबत कारवाई करण्याचे निर्देश तत्काळ देण्यात येतील. राज्य उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 आणि वर्ग 4 ची भरती टीसीएस कंपनीमार्फत केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथम इतकी मोठी पदभरती केली जात आहे. (हेही वाचा: Maharashtra: स्कूल बसचे भाडे वाढले, तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी वाढ)
टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.