सरकारी नोकर भरतीमध्ये दिव्यांगाना 4 टक्के आरक्षण लागू, राज्य सरकारची मंजूरी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सरकारी नोकर भरतीमध्ये आता दिव्यांगाना 4 टक्के आरक्षण लागू होणार असल्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्याचसोबत दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सरकार दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार आहे. तर अंध,कर्णबधीर, अस्थिव्यंग,शारिरिक वाढ खुंटणे अशा विविध प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरीमध्ये 1 टक्का वाढीव जागा मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून 2016 रोजी दिव्यांग अधिनियमानुसार 4 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. सरकारी नोकर भरतीमधील अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षघात, कुष्ठरोग मुक्त, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायूविकृती अशा विविध प्रकारांसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळींची एक बैठक पार पडली. या बैठकीत दिव्यांगांच्या आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.(Maharashtra PG Medical Admission 2019 प्रवेशप्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही- हायकोर्ट)

तसेच दिव्यांगाना क्रिडा विकास, शिक्षण, शासकीय आयआयटी आणि खासगी क्षेत्रात रोजगाराची समान संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास होण्यासाठी विविध उपाययोजना राबल्या जाणार आहेत.