Bombay High Court | Maratha Reservation | (Photo Credits: Archived, edited, representative images)

डिसेंबर 2018 मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षात मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (Postgraduate Medical Admission) लागू होणार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) दिला आहे.

दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण देण्यावर डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुज लद्दड, डॉ. रशिका सराफ यांच्यासह इतर उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यासाठी त्यांनी नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. (Maharashtra PG Medical Admission 2019 प्रवेशप्रक्रियेत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार)

प्रवेशप्रकियेमध्ये 16% जागा या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसंच उपलब्ध जागांवर आरक्षण लागू करण्यात येत असल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. कारण मेडिकल पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर 2018 मध्ये सुरु झाली असून मराठा आरक्षण कायदा डिसेंबर 2018 मध्ये लागू करण्यात आला, म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होऊ शकत नसल्याचे याचिकेत म्हणण्यात आले आहे.

या याचिकेवर आज न्यायालयाने निर्णय दिला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू होणार नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.