'पर्रीकरांच्या आरोग्यापेक्षा गोव्यात भाजपला त्यांच्या पादुका ठेऊन राज्य चालवण्यात स्वारस्य'
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (संग्रहीत आणि संपादीत प्रतिमा)

गोव्यात मुख्यमंत्री बदलावा अशी स्थिती आहे, पण भाजपला पर्रीकरांच्या नावाने वेळ काढून लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘रेटारेटी’ करायची आहे. ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल, अशा तीव्र शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपनेतृत्वावर हल्ला चढवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी बसवता येईल असा एकही लायकीचा माणूस गोव्याच्या भाजपात नाही. त्यामुळे आजारी व थकलेल्या पर्रीकरांच्याच पादुका मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर ठेवून सरकार चालवा असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. हा निर्णय म्हणजे गोव्याच्या जनतेवर आणि खुद्द पर्रीकर यांच्यावर अन्याय आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेसुद्धा वाचा, 'पेट्रोल, डिझेलची महागाई, जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? )

‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय? ते हेच!

' गोव्यात बाजारबुणगे!' मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात लिहीलेल्या लेखात गोव्यातील विद्यमान राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. या स्थितीवर भाष्य करताना ठाकरे आपल्या लेखात म्हणतात, 'गोव्यात आज राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षात उरले नसून फक्त बाजारबुणगे राहिले आहेत. गोव्यात सगळेच बिघडले आहे. पर्रीकर ठणठणीत होते तेव्हा आकाशातून चांदण्यांची बरसात होत होती व सर्वकाही आलबेल होते अशातला भाग नव्हता, पण सत्ता व धाकदपटशाच्या बळावर ते रेटून नेत होते. गोव्यात मुख्यमंत्री बदलावा अशी स्थिती आहे, पण भाजपला पर्रीकरांच्या नावाने वेळ काढून लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘रेटारेटी’ करायची आहे. ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल.

पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती

आजारी व थकलेल्या पर्रीकरांच्याच पादुका मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर ठेवून सरकार चालवा असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. हा निर्णय म्हणजे गोव्याच्या जनतेवर आणि खुद्द पर्रीकर यांच्यावर अन्याय आहे. पर्रीकरांवर आता मुख्यमंत्रीपद लादणे हे निर्घृण व अमानुष राजकारण आहे. पर्रीकर यांचा स्वभाव स्वस्थ बसण्यातला नाही, त्यांना विश्रांतीची व उपचारांची गरज आहे, पण दिल्लीच्या इस्पितळातील खाटेवरूनही ते गोव्यात लक्ष ठेवतात, फायलींबाबत विचारणा करतात, नेतृत्वबदलाच्या हालचाली करणार्‍यांशी संवाद साधतात. हा ताणतणाव त्यांच्या सध्याच्या नाजूक प्रकृतीस झेपणारा नाही, पण भाजप हाय कमांडला हे समजवायचे कोणी? त्यांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती आहे. भाजपच्या विजयी नकाशावरील गोवा टिकला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे, अशी थेट टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.